जळगाव मिरर | १९ नोव्हेंबर २०२६
एकच नाव असलेल्या महिलांच्या मदतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे आणि बनावट दस्त तयार करून मेहरुण शिवारातील २९०.३१ जमीन हडपली. ही घटना दि. २७ ऑगस्ट २०२४ ते दि. १८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नाशिक व धुळे जिल्ह्यातील खरेदीदार, साक्षीदारांसह ६ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गांधी नगरात राहणारे विलास श्यामराव कुमावत (वय ६१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहरुण शिवारातील सव्हें क्रमांक १६ पैकी भूखंड क्रमांक १ मधील २९०. ३१ चौरस मीटर ही जागा त्यांची आई धुपदाबाई श्यामराव मित्री (कुमावत) व आत्या सुंदराबाई तानाजी मिस्त्री (कुमावत) यांच्या मालकिची होती. नंतर आत्याने ती धुपदाबाई यांच्या नावावर करून दिली. त्यानंतर कोरोना काळात धुपदाबाई यांचेही निधन झाले. मात्र जमिनीच्या सातबाऱ्यावर वारसांचे नाव लावले गेलेले नव्हते. असे असताना सदर जागा विजया नरेश क्षत्रीय यांच्या मालकिची असल्याची जाहीर नोटीस वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली. त्या वेळी हा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात आला. त्यांनी या विषयी खरेदीसाठी वापरलेल्या कागदपत्रांची प्रत मिळविली असता ते सर्व बनावट असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला.
न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले व या प्रकरणी विलास कुमावत यांनी दि. १८ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नाव साधर्म्य असलेल्या सुंदराबाई तानाजी मिस्त्री, धुपदाबाई श्यामराव मित्री (दोन्ही रा. सावरकर नगर, नाशिक), खरेदीदार विजया नरेश क्षत्रीय (रा. धुळे), प्रमोद निरंजन भट्टा (रा. सिडको, नाशिक), सफुद्दीन तहेभाई बोहरा (रा. धुळे), मिलिंद एकनाथ निकम (रा. साक्री, जि. धुळे) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार दीपक शिरसाठ करत आहेत.





















