जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२४
नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या बाप-लेकाच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. या अपघातात समाधान वना चौधरी (वय ४०, रा. वराड, ता. धरणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवार दि. २० रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नेरी गावाजवळ झाला.
मिळालेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील वराड येथे समाधान चौधरी हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता समाधान चौधरी हे आपला मुलगा दुर्गेश समाधान चौधरी (वय १४) यांच्या सोबत पहूर येथे नातेवाईकांनी भेटण्यासाठी जात होते. वावडदा मार्गे दुचाकीने जात असतांना नेरीगावानजीक समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एमएच २० एफजी ५३६४) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार समाधान चौधरी हे जागीच ठार झाले तर मुलगा दुर्गेश चौधरी हा गंभीर जखमी झाला.
अपघातात जखमी झालेल्या दुर्गेशला खासगी वाहनातून जळगावातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर मयत समाधान चौधरी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. प्रसंगी त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. मयत समाधान यांच्या पश्चात आई, भऊ, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे