जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील महामार्गावरील हिरा मारुती जवळील पुलाच्या संरक्षण भिंतीला धडक देत नाशिकहून कलकत्त्याकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या अपघात जीवीत हानी झाली नसून ही घटना रात्री झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिककडून आलेला तथा कलकत्ता शहराकडे जाणारा ट्रक (डब्ल्यूबी २३, जी०१२२) हा पहाटेच्या वेळेस वरणगाव येथील हिरा मारुती समोरील मोहम्मदपुरा नाल्यावर बांधलेल्या पुलाच्या संरक्षण भिंतीला धडक देत रस्त्यावरच उलटला. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात ट्रकची चाके निखळून पडली आहेत. त्यामुळे महामार्गावरुन पुढे जाण्यासाठी जागा नसल्याने हिरा मारुती, दर्यापूर येथील फाट्यापर्यंत एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात कोणत्याच प्रकारची नोंद करण्यात आलेली नव्हती.