जळगाव मिरर | 6 ऑगस्ट 2026
मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या ऋषीकेश उत्तम कचरे (वय २८, रा. हनुमान नगर, अयोध्यानगर) या तरुणाचा शिरसोली जवळील चंबार दडी या पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने तरुणाला बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषीत करताच त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या नगरातील हनुमान नगरात ऋषीकेश कचरे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी तो त्याच्या काही मित्रांसोबत चंभारदरी पाझर तलावाजवळ पार्टीसाठी गेला होता. यावेळी मित्रांसोबत तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. घटनास्थळावरून माहिती मिळताच शिरसोली गावाचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी तात्काळ घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेकॉ धनराज गुळवे व चेतन पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.
ऋषिकेशला पट्टीचे पोहणारे तीन जणांनी पाण्यात बाहेर काढले घटनास्थळा वरुन तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयता एकच आक्रोश केला.
ऋषिकेश हा रोजंदारीवर हातमजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता. दीड वर्षापुर्वी त्याचा विवाह झाला असून दोन महिन्यांपुर्वी त्याला मुलगा देखील झाला आहे. काळाने त्याच्यावर झडप घातल्याने दोन महिन्याच्या चिमकल्याच्या डोक्यावरील पितछत्र हरपल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





















