जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२४
जामनेर तालुक्यातील पहूर येथे शेतातून काम करून घराकडे येताना जळगाव ते छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील गणेश नर्सरीजवळ दुचाकीला कारने दिलेल्या धडकेत पहूर पेठ येथील ज्ञानेश्वर उर्फ बाळू रामकृष्ण तरवडे (वय ४३) हे गंभीर जखमी झाले होते. संध्याकाळी त्यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर रामकृष्ण तरवडे हे दुचाकीने शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतातील काम आटोपल्यानंतर संध्याकाळी घरी परत येत असताना जळगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गणेश नर्सरीजवळ रस्ता ओलांडात असताना इको कार (एमएच- १९, ईजी- ४७०१) ने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर तरवाडे गंभीर जखमी झाले होते. पहूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी देवेंद्र घोंगडे, संदीप घोंगडे यांच्यासह पहूर पेठचे सरपंच अफजल तडवी, सलीम शेख गाणी यांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने मदत केली.
अपघातग्रस्त वाहनाने ज्ञानेश्वर तरवाडे यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी तपासणी केल्यानंतर ज्ञानेश्वर तरवाडे यांना मृत घोषित केले. या प्रकरणी ईको वाहनाचे चालक तथा धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे राहणाऱ्या इमरान अलीम पटेल (वय ३१) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पहूर पोलीस करत आहेत.