जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२४
द्वारदर्शनाहून परतत असतांना मागून भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दीपक कडू सुर्यवंशी (वय ४५, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नशिराबाद ते भुसावळ दरम्यान गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावर झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील दीपक सूर्यवंशी हे गावातीलच एका मेडिकलवर कामाला होते. त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने ते सासऱ्यांसह रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे द्वारदर्शनासाठी गेले होते. त्याठिकाणी सासऱ्यांना सोडून दीपक सुर्यवंशी हे (एमएच १९, एएम १६६६) क्रमांकाच्या दुचाकीने घरी येण्यासाठी निघाले. घरी परतत असताना नशिराबाद गावापासून काही अंतरावर असतानाच वैद्यकीय महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, ईए ७७९६) चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात सूर्यवंशी यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळताच पोउनि संजय राऊत, पोहेकॉ शरद भालेराव, हरीश पाटील, संजय महाजन, सागर भिडे हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी गंभीर जखमी असलेल्या सूर्यवंशी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईकांसह मित्र परिवाराची मोठी गर्दी झाली होती.
मयताच्या पश्चात पत्नी व सुकांक्षा व दिव्या या दोन मुली आहे. दुर्देवी काळाने झडप घालून दोन्ही मुलींच्या डोक्यावरचे पितृछत्र हिरावून घेतले. दीपक सुर्यवंशी यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता, तसेच ते आपुलकीने बोलणारे असल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच गावात शोककळा पसरली होती.