जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात वाळूचोरी करीत होते. हि वाळूचोरी रोखण्यासाठी यावल तालुक्यातील शिरसाड गावाजवळील महिला मंडळाधिकारी घटनास्थळी गेले असतांना वाळू माफीयांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी यावल पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली असून गुन्ह्यातील पळवून नेण्यात आलेले ट्रॅक्टर व टॉली पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, अटकेतील संशयिताना यावल न्यायालयात हजर केले असता चौघांना 4 सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी अवैध वाळू वाहतूक करणार्या एका ट्रॅक्टरला बामणोद येथील महिला मंडळ अधिकारी यांनी रोखले होते. त्यांच्याशी धक्काबुक्की करीत सदर ट्रॅक्टर पळवण्यात आले होते व या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शिरसाड, ता.यावल या गावाकडून गुरूवारी थोरगव्हाण येथे बामणोद येथील महिला मंडळ अधिकारी बबीता चौधरी या जात असताना शिरसाड गावाजवळील रस्त्यात त्यांना निळ्या रंगाचे ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करतांना दिसल्याने त्या ट्रॅक्टरच्या सिटवर बसल्या असतांना त्यांना तेथून ओढून खाली खेचत ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले व याप्रकरणी यावल पोलिसात शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांनी ट्रॅक्टर व ट्राली जप्त केली असून निलेश समाधान सोनवणे, अजय दिलीप भालेराव (दोघे राहणार थोरगव्हाण), मयूर उर्फ अमोल प्रकाश कोळी (शिरसाड) व गोविंदा वना माळी (रा.साकळी) या चार जणांना अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे व श्यामकांत धनकर करीत आहे. मंडळाधिकारी बबीता चौधरी यांनी तीन संशयीतांचा उल्लेख फिर्यादीत केला होता मात्र वाद घालणारे तीन संशयीत दुचाकीव्दारे पळाले होते व एक संशयीताने ट्रॅक्टर ट्रॉली पळवल्याने तपासात एक संशयीत वाढल्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी सांगितले.