जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२४
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील पिंप्राळा शिवारात निंदणी करताना अंगावर वीज कोसळून तरुण शेतकरी जागीच ठार झाला. ईश्वर शांताराम सुशीर असे त्याचे नाव आहे. शेतात सोबत काम करणाऱ्या आई-वडीलांच्या डोळ्यादेखत ही दुर्दैवी घटना घडल्याने ‘कडाडली वीज निरंजनी, ईश्वरालाच घेऊन गेली’ असं म्हणण्याची वेळ उतारवयात त्यांच्यावर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुऱ्हापासून जवळच पिंप्राळा नावाच लहानसं गाव आहे. गावानजीकच्या शेतात ईश्वर सुशीर वय २२ हा तरुण शेतकरी रविवारी सकाळी आठ वाजेपासून आपल्या आई वडीलांसह निंदणीचे काम करीत होता. अचानक दुपारी अडीच वाजता वातावरणात बदल झाला. आकाश भरून आले व ढगांची दाटी झाली. सोसाट्याचा वारा सुटला आणि जोरदार वीजाचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यात जोरदार वीज कडाडली आणि ती निंदणी करत असलेल्या ईश्वरच्या अंगावर कोसळली. त्यात गंभीरपणे भाजला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. काबाड कष्ट करून व दिवसाची रात्र करून आर्थिक परिस्थिती बदलण्याचं स्वप्न पाहिलेल्या तरुण लेकराचा मृत्यू डोळ्यादेखत पाहावा लागल्याने आई वडीलांचे अवसान गळाले. लेकराच्या कलेवराकडे पाहत त्यांनी शिवारात हंबरडा फोडला. आजूबाजूच्या शेतातील लोक धावून आले. पण तोपर्यंत ईश्वर ‘देवाघरी’ निघून गेला होता. त्याच्या मृत्यूने पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून पाऊस थांबला होता मात्र उकाडा वाढला होता अशा परिस्थितीत शेतकरी शेतातील कामे करण्यासाठी प्रयत्न करत होते दि.१८ ऑगस्ट रोज रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक वातावरण बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला यामध्ये पिंप्राळ्याचा ईश्वर विज पडून मयत झाला. घटनेची माहिती समजताच प्राथमिक आरोग्य केंद्र कुऱ्हा येथे गावातील, कुऱ्हा येथील नागरिकांनी गर्दी केली वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली मात्र त्याची प्राणज्योत मालवली होती.
पिंप्राळा शेती शिवारात स्वतः च्या शेतात शांताराम सुशिर यांच्या सह त्यांचे कुटुंबीय रविवारी सकाळपासून निंदनीचे काम करत होते अचानक वातावरण बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला यामध्ये अंगावर विज पडून त्यांचा मुलगा ईश्वर खाली कोसळला संपूर्ण कुटुंब कुटुंब धावून मुलाजवळ गेले एकच आक्रोश करत होते. जोराचा पाऊस सुरू काय करावे सुचत नव्हतं. बैलगाडी चा रस्ता बैलगाडी जुंपली गाड्यावर मुलाला ठेवले आणि पिंप्राळा गावापर्यंत आणले तोपर्यंत गावातील तरुणांनी ऑटो रिक्षांची व्यवस्था केली दवाखान्यात आणले मात्र तोपर्यंत तो देवाघरी निघून गेला होता.