जळगाव मिरर | १६ जुलै २०२५
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील एकाने वृत्तपत्रांच्या पार्सलवरून वाद झाल्याने एसटी वाहकाला मारहाण केल्याची घटना १३ रोजी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर डेपोतील वाहक भगवान साहेबराव पारधी (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते १३ रोजी सकाळी अमळनेर ते सोनगीर बस घेऊन निघाले. वाहक सिटाखाली नेहमीप्रमाणे वृत्तपत्रांचे बंडल ठेवले होते. सकाळी ७.३० वाजता ही बस मांडळ येथे पोहोचली. नेहमी पार्सल उतरवणारा युवराज पाटील हा आलेला नव्हता. तर नवीन २५ ते २८ वयोगटातील तरुणाने पार्सलबाबत विचारणा केल्याने वाहक भगवान पारधी यांनी त्यास पार्सल काढून दिले. मात्र, त्या तरुणाने ‘तुला पार्सल नीट आणता येत नाही का? त्यावर तू पाय ठेवून का आणले ?’, असे म्हणत आरडाओरड सुरु केली. तसेच वाद वाढल्याने त्याने वाहकाला शिवीगाळ करत कॉलर पकडून बाहेर ओढत चापट बुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच तू मांडळ रूटला कशी ड्यूटी करतो, तेच पाहतो, असे म्हणत धमकी दिली. दरम्यान, वाहक भगवान पारधी यांनी पोलिस पाटील यांना बोलावले असता या मारहाण करणाऱ्याचे नाव महेश नामदेव ठाकूर असल्याचे त्यांनी सांगितले. वाहकाने कर्तव्य पार पाडल्यानंतर वाहतूक निरीक्षकांना ही घटना कळवली. त्यानंतर या प्रकरणी मारवड पोलिसांत शासकीय कामकाजात अडथळा आणत मारहाण केल्याप्रकरणी महेश नामदेव ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास हे. कॉ. सुनील पाटील करत आहेत.




















