जळगाव मिरर | ४ जुलै २०२५
नैराश्यातून विनय अशोक देशमुख (वय २९, रा. मोहन नगर) या तरुणाने मेहरुण तलावात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. दिवसभर शोधकार्य सुरू होते, सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह तरंगताना मिळून आला. ज्यामुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मोहन नगरात विनय देशमुख हे वास्तव्यास असून त्याचे शहरात झेरॉक्सचे दुकान आहे. तर त्याचे वडील अडावद येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षक आहेत. गेल्या काही दिवसांपासून विनय नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला असल्याचे त्याच्या कुटुंबीयांना वाटले. मात्र, तो दुकानावर पोहोचला नसल्याचे कळताच कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचा शोध सुरु असताना विनय मेहरून तलावावर गेल्याची माहिती मिळाली. तलावाच्या परिसरात त्याची दुचाकी मिळून आली होती. यामुळे त्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला. तात्काळ कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दिवसभर शोध मोहीम सुरू होती, मात्र विनयचा शोध लागला नव्हता. अखेर, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला, जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मुलाचा मृतदेह बघताच त्याच्या कुटुंबियांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




















