जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२४
राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून नांदेड शहरातील तरोडा भागात सरपंचनगर येथे मंगळवारी (दि. २९) दुपारी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने एका चार चाकी बोलेरो वाहनातून लोखंडी पेट्यांमधून जाणारा एक कोटी पाच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. याबाबतची माहिती पोलिस ठाण्यात तसेच निवडणुक विभागाला देण्यात आली आहे. सदरील रक्कम नेमकी कुणाची हे अद्याप स्पष्ट झाले नसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असून पोलिसांसह जिल्हा प्रशासनाचे पथक देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे. नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरपंचनगर येथे गस्त घालत असताना भाग्यनगर पोलीस ठाण्याचे फौजदार देशमुख यांनी चार चाकी वाहनाला रोखले. त्यानंतर सदरील वाहनाची तपासणी केली असता त्यात लोखंडी पेटयांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचे दिसून आले.
त्यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांनी घटनास्थळी जाऊन चालकाकडे या रोकडबाबत माहिती विचारली असता चालकाने योग्य ते उत्तर दिले नसल्यामुळे सदरील रक्कम जप्त करून पोलिसांनी वरिष्ठांना तसेच निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली. त्यानंतर रक्कमेबाबत शहानिशा करणे चालू असून निवडणूक आयोगाने पुढील निर्णय देईपर्यंत व रक्कमेबाबत योग्य ते समाधान झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांनी दिली आहे.
