जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२४
राज्यातील बदलापुरात दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदेला (२३) पोलिसांनी सोमवारी कंठस्नान घातले. तळोजा कारागृहातून सोमवारी त्याला बदलापूर येथे घेऊन जात असताना त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावत दोन ते तीन गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर पथकातील दुसऱ्या पोलिसाने अक्षयवर गोळ्या झाडल्या. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे अक्षयचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या आदर्श शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदेने १२ आणि १३ ऑगस्ट रोजी दोन मुलींवर अत्याचार केले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली होती. अक्षयच्या पहिल्या पत्नीने दाखल केलेल्या नव्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस तळाेजा कारागृहात गेले होते.
सायंकाळी ६ ते ६.१५ वाजेच्या सुमारास पोलिस व्हॅन मुंब्रा बायपासजवळ येताच अक्षय शिंदेने सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावले आणि त्यांच्या दिशेने जवळपास ३ गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी नीलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली. इतर २ गोळ्या बाजूने निघून गेल्या. तत्काळ दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यात अक्षय गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात अाले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, एन्काउंटर संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर राज्य सरकारने चाैकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
आरोपी अक्षय शिंदेचे एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूरकरांत जल्लोष साजरा झाला. शहरात बदलापूरकरांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. विशेषत: महिलांनी एकमेकींना पेढे भरवून, मिठाई वाटून अानंद व्यक्त केला.