जळगाव मिरर / २४ मार्च २०२३
अमळनेर-धुळे रस्त्यावरील डांगर शिवारात असणाऱ्या पांडुरंग पेट्रोल पंपावर दि २३ रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमराास अज्ञात इसम आला. त्याने बंदुकीचा धाक दाखवून सुमारे ३६ हजार ५०० रुपये लुटून नेले. यावेळी पेट्रोल पंपावर किशोर रविंद्र पाटील आणि नरेंद्र सोनसिंग पवार हे कार्यरत होते. यावेळी चेहरा पूर्णपणे काळ्या रंगाच्या रुमालाने बांधलेला एक अनोळखी पुरुष आला आणि त्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवले. त्याच्याजवळ असलेल्या पिस्टलचा दाखवून त्यांच्याकडे असलेले पेटोल-डिझेल विक्रीचे पैसे हिसकावन घेतले.
यादरम्यान एक चारचाकी चालक पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला. लुटारूने त्याच्या गाडीच्या डिक्कीला लाथा मारून चालकास गाडीबाहेर निघण्यास भाग पाडले. मग त्यालाही बंदुकीचा धाक दाखवत त्याच्या कानाखाली मारली. त्याच्याजवळ असलेले पाकिट हिसकावून तो पळाला. रस्त्यावर एक जण मोटरसायकल घेऊन उभा होता. ते दोघेही मोटरसायकलवर बसून धुळ्याकडे रवाना झाले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली.
नरेंद्र पवार याच्याकडून 13 हजार 200, किशोर पाटील याच्याकडून 14 हजार 300 आणि इंडिका कारमध्ये डीझेल टाकण्यासाठी आलेल्या संजय भामरे यांच्याकडून 9 हजार रुपये असा एकूण 36 हजार 500 रुपये अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून चोरून नेले आहेत. याबाबत नरेंद्र पवार याने अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.