जळगाव मिरर । ३० जानेवारी २०२३ ।
राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालेली असल्याचे नेहमी दिसून येत आहे. यात कोण गुन्हा करेल हे सुद्धा सांगता येत नाही लहानात लहान मुलगा असो वा वयोवृद्ध व्यक्ती सर्वच गुन्हेगारीच्या क्षेत्रात पाय रोवून ठेवले आहे. अशीच एका धक्कादायक घटना औरंगाबाद शहरातून समोर आली आहे.
औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या एका गावठी दारूच्या विरोधात केलेली कारवाई चर्चेचा विषय बनला आहे. कारण शहराच्या मध्यवस्तीत सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा चक्क एक 82 वर्षीय वृद्ध व्यक्ती चालवत होता. औरंगाबाद शहरातील दगड गल्ली, कुंभारवाड्यात छापा मारून पोलिसांनी तब्बल एक हजार 800 लिटर गावठी दारू आणि 400 लिटर दारू बनविण्याचे मिश्रण तसेच इतर साहित्य, असा 6 लाख 42 हजार 905 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर या प्रकरणी एका 82 वर्षीय वृद्धाविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शंकर नारायण आचार्य (वय 82 वर्षे, रा. सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ, दगडगल्ली, कुंभारवाडा, औरंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके यांचे पथक शहरात गस्तीवर होते. दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला शंकर नारायण आचार्य आपल्या घरी तिसऱ्या मजल्यावर मोठ्याप्रमाणात गावठी दारू बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच शेळके यांच्यासह उपनिरीक्षक गायकवाड, अंमलदार शेख हबीब, विजय निकम, संजय मुळे, संजय गावंडे, राजेंद्र साळुंके, अनिता त्रिभुवन आदींचे पथक आचार्यच्या घराजवळ गेले. दरम्यान पंचांना बोलावून घेत पथकाने त्याच्या घरावर छापा मारला. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण पंधरा ड्रम भरून दारू जप्त केली आहे. ज्यात 50 लिटर मिश्रण असलेली 100 लिटरची स्टीलची टाकी, 1400 लिटर दारू असलेले 200 लिटरचे सात ड्रम, चारशे लिटर दारू असलेले 100 लिटरचे चार ड्रम, चारशे लिटर मिश्रण असलेले चार ड्रम, दोन लोखंडी शेगड्या (भट्ट्या), दोन सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार, एक किलो सोडियम बायकार्बोनेट, गूळ, पावडरचे पाकीट, सहा किलो नवसागर, प्लास्टिकच्या बकेट, टोपले, नरसाळे, गावठी दारूचे मिश्रण ढवळण्यासाठी साडेचार फूट लांबीचा बांबू आदी साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आचार्य हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो फार पूर्वीपासून गावठी दारूचा अड्डा चालवित आहे. त्याच्या अड्यावर यापूर्वीही पोलिसांनी छापा मारलेला आहे. मात्र वयाचे 82 वर्षे झाले असताना देखील त्याने गुन्हेगारी वृत्ती अजूनही सोडलेले नाही. दरम्यान आता पुन्हा एकदा त्याच्या घरावर छापा मारत गुन्हे शाखेच्या पथकाने साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.