
जळगाव मिरर | १९ जून २०२६

नशिराबाद येथील नगराध्यक्ष तथा हॉटेल व्यावसायिक कुटुंबातील २७ वर्षीय तरुणाचा मुंबईत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आली. पवन सुनील पाटील (वय २७, मूळ रा. नशिराबाद, ता. जळगाव, ह.मु. अयोध्या नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे नशिराबाद आणि जळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन पाटील हे नशिराबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष तथा हॉटेल व्यावसायिक योगेश पाटील यांचे पुतणे होते. ते जळगावातील अयोध्या नगर परिसरात वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी ते मित्रांसोबत मुंबई येथे फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान, १८ जून रोजी सकाळच्या सुमारास मुंबईतील वर्सोवा परिसरात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व नातेवाईक तातडीने मुंबईकडे रवाना झाले. या अनपेक्षित घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पवन पाटील यांचे कुटुंब राजकारण आणि हॉटेल व्यवसाय क्षेत्रात सक्रिय असून परिसरात त्यांची ओळख आहे. घरातील परिस्थिती चांगली असतानाही अशा प्रकारची घटना घडल्याने नातेवाईक आणि परिचितांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी केली जात असून मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. अधिकृत तपास अहवालानंतरच नेमकी माहिती समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे नशिराबाद आणि जळगाव परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी पवन पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.




















