जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२३
धरणगाव तालुक्यातील पाळधी गोमांसची वाहतूक करत असल्याच्या संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना बायपास परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते.
गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित ट्रक पाळधी गावातून जात असताना त्यातून वास येत असल्याचा तेथील लोकांना संशय आला. उपस्थितांनी पोलिसांना बोलावून ट्रक जमा केला. त्यानंतर तो ट्रक पाळधी बायपास गोडाऊनला घेऊन गेले असता तिथे संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. घटनेची माहिती मिळताच जळगाव येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा नियंत्रक पथक नेमण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.