जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२४
जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या निंबादेवी धरण येथे मित्रांसोबत गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्याचा डोहात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची १९ ऑगस्टला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता. तालुक्यातील निमगाव येथील वेदांत सुवर्णसिंग पाटील (वय २०) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील निमगाव येथे वेदांत पाटील हा आई-वडील आणि बहीण सोबत वास्तव्याला होता. सध्या तो पदवीचा शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. रक्षाबंधनानिमित्त सुट्टी असल्याने वेदांत हा त्याच्या मित्रांसोबत १९ ऑगस्ट रोजी दुपारी निमगावपासून जवळच असलेल्या निंबादेवी धरणावर फिरण्यासाठी गेला होता. मित्रांसोबत जात असताना त्याचा पाय घसरून तो पाण्याच्या डोहात पडला. त्यानंतर तो वर आलाच नाही. त्यानंतर तेथील पट्टीच्या पोहोणाऱ्यांनी त्याला बाहेर काढले व तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी त्याला मयत घोषित केले. दरम्यान, घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडील यांनी प्रचंड आक्रोश केला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिसात नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.