जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२३
सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्राम हे लोकप्रिय अॅप असून याचा वापर लहान मुलांपासून ते वृद्धापर्यत होवू लागला आहे. यावर असणारं रील्स फीचर हे यूजर्सना विशेष आवडतं. कित्येक यूजर्स स्वतःही रील्स बनवत असतात; तर कित्येक इन्फ्लुएन्सर्स या माध्यमातून तगडी कमाई देखील करतात. तुम्हालाही इन्स्टावर रील्स बनवणं आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
मेटा कंपनी इन्स्टावरील क्रिएटर्ससाठी एक नवीन फीचर आणणार आहे. यामुळे रील्सची वेळ ही 3 मिनिटांवरून तब्बल 10 मिनिटं होणार आहे. टेक क्रंच वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. कंपनी सध्या या अपटेडची चाचणी करत असून, लवकरच हे अपडेट लाँच केलं जाईल असं मेटाने म्हटलं आहे.
सध्या इन्स्टाग्रामवर केवळ तीन मिनिट लांबीचे व्हिडिओ पोस्ट करता येतात. यामुळे कित्येक क्रिएटर्सना आपले व्हिडिओ अधिक सविस्तर बनवता येत नाहीत. 10 मिनिटांपर्यंत हा वेळ वाढवल्यास इन्फ्लुएन्सर्स अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतील. याचा फायदा एज्युकेशनल व्हिडिओ, टिप्स आणि हॅक्स सांगणारे व्हिडिओ किंवा कुकिंगबाबतचे व्हिडिओ अशा प्रकारचा कंटेंट तयार करणाऱ्यांना होणार आहे. सोबतच इतर यूजर्सनाही हे अपडेट फायद्याचं ठरेल. या फीचरची चाचणी सुरू असून, ते कधी लाँच होईल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, टिकटॉक या सोशल मीडिया अॅपवर देखील 10 मिनिटांचे व्हिडिओ पोस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, हे अॅप चिनी कंपनी बाईटडान्सच्या मालकीचं असल्यामुळे भारतात यावर बंदी लागू करण्यात आली आहे.