जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२४
पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बालिकेच्या मागे जाऊन अटेंडंटने ट्रेनच्या स्वच्छतागृहात तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली. यामुळे रेल्वे प्रवाशांचा रोष अनावर झाला आणि त्यांनी आरोपीची बेदम धुलाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी मोहम्मद मुन्ना (५०, रा. गया, बिहार) हा आठ वर्षांपासून तो रेल्वेत कोच अटेंडंट म्हणून काम करतो. बंगळुरू पाटणा- पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या एसी थ्री टायरमधील बी-टू कोचमध्ये त्याची ड्युटी होती. या कोचमध्ये एक ७५ वर्षीय वृद्धा, तिची विवाहित मुलगी अन् नात (वय नऊ) तसेच छोटा नातू यांच्यासह प्रवास करीत होती. ही गाडी नागपूरकडे येत असताना बुटीबोरी स्थानकाजवळ मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास नऊ वर्षीय मुलगी बाथरूमला जाण्यासाठी निघाली. मुलगी बाथरूममध्ये शिरताच तिच्या मागेच असलेला आरोपी मुन्ना दार ढकलून बाथरूममध्ये गेला.
दाराची कड़ी आतून लावून त्याने मुलीशी नको ते चाळे केले. त्याचा विरोध करीत मुलगी ओरडू लागली, त्यामुळे घाबरून त्याने बाथरूमच्या दाराची कडी उघडली. मुलगी बाहेर पळत आली आणि आईला आपबिती कथन केली. संतप्त आईने आरडाओरड करीत अन्य प्रवाशांना ही माहिती दिली. संतप्त प्रवाशांनी आरोपी मुन्नाला ओढून बेदम मारहाण केली.