जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२३
भडगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा निषेध म्हणून शुक्रवारी भडगावात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चमकोगिरी केल्याचे वक्तव्य केल्याने एका पत्रकाराला आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ केली. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ‘ज्याला जशी भाषा कळते, त्याच भाषेत आपण उत्तर दिले’ सांगून आ. पाटील यांनी चक्क या शिवीगाळ प्रकरणाचे समर्थनच केले आहे. या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
या मोर्चात सहभागी असलेले आमदार पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी शासनाकडून चांगला वकील देण्यात येईल आणि भक्कम पुरावे उभे केले जातील, यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन दिले होते. यावर संबंधित पत्रकाराने मुख्यमंत्र्यांनी चमकोगिरी केल्याचे म्हटले होते. यावरून आमदार आणि पत्रकार यांच्यात वाद झाला. आमदारांनी संबंधित पत्रकाराला ‘तू जास्त मस्तीला आला आहे का?’ अशी विचारणा करून ‘तू ये तुला दाखवतोच.. पत्रकार हा त्यांना शिवीगाळ करू नका.. असे सांगत असतानाही आमदार त्याला दमदाटी व शिवीगाळ करीत आहे. तू याचे रेकॉर्डिंग कर… असे आव्हानही आमदारांनी दिले.
जश्याला तसे उत्तर ; आ.किशोर पाटील !
मुख्यमंत्री हे १२ कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना हा पत्रकार मुख्यमंत्र्यांनी चमकोगिरी केली, असे म्हणतोच कसा… या पत्रकाराला आपणच शिवीगाळ केली आहे. त्याचा मला अभिमान आहे. आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे शब्द मागे घेणार नाही.