जळगाव मिरर | २२ नोव्हेबर २०२३
एरंडोल तालुक्यातील उत्राण अहिर हद्दीत गट नंबर ४ मध्ये अज्ञात इसमाने सुमारे १२० ब्रास अवैध वाळूचा साठा केला होता. याबाबत तहसीलदार सुचिता चव्हाण यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळावर जाऊन साठ्यांचे पंचनामे केले व हा वाळूसाठा तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. दोन डंपर, एक ट्रॅक्टर व एक जेसीबी या वाहनांच्या मालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी पथकाने उत्राण येथे जाऊन गावातील २० वाहनांची दहा कलमी कार्यक्रमांतर्गत माहिती घेतली. ही वाहने व मालक काय काम करतात, याबाबत त्यांना नोटीस काढण्यात येणार असून त्यांच्या मोबाइलच्या कॉल डिटेल्सची पडताळणी करण्यात येणार आहे. याशिवाय नागदुली व म्हसावद भागात अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी वापरलेले दोन तराफे नष्ट करण्यात आले. ही कारवाई करणाऱ्या पथकात तहसीलदार सुचिता चव्हाण मंडल अधिकारी विनायक मान कुंबरे, सुधीर मोरे, मनोज शिंपी, दीपक ठोंबरे, संजय साळुंखे, सुरेश कटारे, सलमान तडवी, शेख शकील, रोहित इंगळे, नितीन पाटील, बालाजी लोंढे, श्रीकांत कासवंदे यांचा समावेश आहे.