जळगाव मिरर | १४ सप्टेंबर २०२४
राज्यातील बदलापूरमधील शाळेतील दोन मुलींवर झालेलया अत्याचाराच्या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यभरातून संतप्त पडसाद उमटले. या घटनेनंतर मुल, महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे संतापाचे वातावरण आहे. मात्र आता पुण्यातही अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या नराधमांनीच चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या 7 वर्षांच्या मुलीवर एका 78 वर्षांच्या नराधम वृद्धाने अत्याचार केला. त्याने त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावत, जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. मधुकर पिराजी थिटे असे 78 वर्षीय गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेत सातवर्षीय पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित वृद्धाला बेड्या ठोकल्या. त्या वृद्ध नराधमाने चिमुकल्या मुलीला खाऊचं आमिष दाखवलं आणि तिला घरी नेलं. तेथे नेऊन तिने तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिचे तोंड दाबून गळ्याला चाकू लावला. तसेच, घरी किंवा पोलिसांना सांगितल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. प्रकरणांमध्ये त्या नराधमांविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.