जळगाव मिरर | २८ जुलै २०२४
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेना मारहाण व खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच उरणमध्ये एका तरुणीची निघृण हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे (२२) असे मृत मुलीचे नाव असून शरीरावर विविध ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची अमानुष हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने तरुणीची हत्या करून राज्याबाहेर पलायन केल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, उरण शहरात एनआय हायस्कूलजवळ राहणारी यशश्री शिंदे (२२) ही गुरुवारी सकाळी घरातून निघाली होती, मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल केली. शुक्रवारी रात्री उरणमधील कोटनाका पेट्रोल पंप येथे एक तरुणी मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहाच्या शरीरावर विविध ठिकाणी निघृणपणे वार केल्याने मृतदेहाची ओळख पटणे मुश्कील झाले होते. मात्र, पोलीस तपासामध्ये मृतदेह बेपत्ता असलेल्या यशश्रीचा असल्याचे निष्पन्न झाले. ही घटना प्रेमप्रकरणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते करत आहेत. आरोपीने तरुणीची हत्या करून उत्तर प्रदेशात पलायन केले असून, अवघ्या काही दिवसांत त्याला जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शनिवारी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, हिंदुत्ववादी संघटनांनी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत घटनेचा निषेध केला. यावेळी आरोपीला त्वरित फाशी व्हावी, अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबीयांनी व संतप्त नागरिकांनी केली. उरण शहरातील व्यापारी असोसिएशनने तरुणीच्या हत्येचा निषेध व्यक्त करत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली. त्यामुळे शहरात शुकशुकाट पसरला होता.