जळगाव मिरर | २९ जुलै २०२६
भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात २७ जुलैला पहाटे एका कुटुंबाच्या घरात बळजबरीने शिरुन पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकल्याची घटना घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे २.३० वाजता आरोपी फिर्यादीच्या घरात शिरले आणि चेतन कुठे आहे? अशी विचारणा केली. संबंधित व्यक्तीबाबत माहिती नसल्याचे फिर्यादीने सांगितल्यानंतर आरोपी संतापले. त्यांनी घरातील सदस्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यातील एका आरोपीने पिस्तूल दाखवत फिर्यादी व त्यांच्या पतीकडे चेतनचा पत्ता विचारला. त्यानंतर आरोपींनी संपूर्ण घराची झडती घेतली. घरातील एका पँटच्या खिशात ठेवलेली ८ हजारांची रोख रक्कम बळजबरीने घेऊन आरोपी पसार झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेप्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून भुसावळ बाजारपेठ पोलीस तपास करत आहेत.





















