जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून मारहाण व खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच नाशिक शहरातील पंचवटी येथे एका खुनाचा थराराची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून त्रस्त होऊन प्रेयसीने मारेकऱ्यांना दोन लाख रुपयांची सुपारी देऊन प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेरी परिसरातील मराठा समाज वसतीगृहासमोरील मोकळ्या जागेत गगन प्रविण कोकाटे (२८, रा. वृंदावन नगर, म्हसरुळ) या युवकाचा खून झाला आहे. प्रेयसी रात्र शाळेतील शिक्षिका असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पंचवटी व गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी तपास करीत खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेसह खुन करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग आढळून आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीएस परिसरातील रात्र शाळेतील शिक्षिकेचे चार ते पाच वर्षांपूर्वी गगन कोकाटे याच्यासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर अनैतिक संबंधात झाले. दरम्यान, वर्षभरापासून गगन कोकाटे या शिक्षिकेस त्रास देत होता. सततच्या त्रासाला कंटाळून प्रेयसी शिक्षिकेने ‘टायगर ग्रुप’चा सातपूर अध्यक्ष संशयित संकेत रणदिवे यास २ लाख रुपयांची सुपारी देत गगनचा खून करण्यास सांगितले. त्यानुसार संशयित संकेत याने त्याच्या इतर साथिदारांसोबत मिळून गगनचा खून करण्याचा कट रचला. संशयितांनी आखलेल्या कटानुसार शिक्षिकेने गगन कोकाटे यास मंगळवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास मेरी परिसरातील मराठा समाज वसतिगृह समोरच्या मोकळ्या जागेत नेहमीप्रमाणे भेटण्यासाठी बोलावले. दोघांमध्ये बाचाबाची सुरू असताना, संशयितांनी धक्का मारून भांडणाची कुरापत काढली. वाद सुरु असताना शिक्षिकेने तेथून पळ काढला. तर संशयितांनी गगनचा खून केला. खून केल्यानंतर मारेकरी पसार झाले.गगन याचे वडिल प्रवीण कोकाटे हे शहर पोलिस दलात कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. प्रवीण कोकाटे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे, पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच खबऱ्यांच्या माहितीवरून सुरुवातीस शिक्षिकेस ताब्यात घेतले. तिच्याकडील सखोल चौकशीतून गगनचा सुपारी देऊन खून केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत काही तासांत शहरातून चौघा मारेकऱ्यांची धरपकड केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, गजानन इंगळे, रवींद्र बागुल, हवालदार प्रविण वाघमारे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड, मुक्तार शेख आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
हे आहेत मारेकरी
संकेत शशिकांत रणदिवे (२०), मेहफुज रशिद सैयद, रितेश दिलीप सपकाळे (२०, तिघे रा. राधाकृष्ण नगर, अशोक नगर, सातपुर), गौतम सुनिल दुसाने (रा. शहीद सर्कल, गंगापुर रोड) यांच्यासह सुपारी देणाऱ्या शिक्षीकेलाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच दोन अल्पवयीन संशयित ताब्यात घेतले आहे.