जळगाव मिरर । १६ जानेवारी २०२३ ।
राज्यात नायलॉन मांजा विक्री ,साठा आणि वापरावर बंदी असल्यावरही अमळनेर शहरात नायलॉन मांजा वापरला गेल्याने त्याचे दुष्परिणाम देखील दिसून आले. या मांज्यामुळे एका व्यक्तीचा ओठ व पायाला कापला गेल्याची घटना मकर संक्रातीच्या दिवशी अमळनेरात घडली आहे.
शहरातील पानखिडकी येथील रहिवासी चंद्रशेखर भावसार हे संक्रांतीच्या दिवशी दुपारी दुचाकीने धुळे रोडवरून जात होते. त्याच वेळी कापलेल्या पतंगासाठी लहान मुले रस्त्यावर पळत होते. अचानक भावसार यांच्या डोळ्याला दोऱ्याचा स्पर्श झाला लागलीच चष्म्याला दोरा घासला जाऊन ओठाला लागल्याने भावसार यांचा ओठ कापला गेला. क्षणभर त्यांना काहीच जाणवले नाही मात्र काही वेळात मोटरसायकलवर रक्त पडू लागताच त्यांना जखम झाल्याचे जाणवले. मोठ्या प्रमाणावर गंभीर जखम झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ परेश पाटील ,डॉ अलिम शेख यांनी तब्बल ३५ टाके टाकून उपचार केले.