जळगाव मिरर : २४ डिसेंबर २०२३
कानुबाई मातेचा उत्सवासाठी दुचाकीवरुन जात असलेल्यांची दुचाकी पंक्चर झाली. दुचाकी रस्त्याच्या साईडपट्टीवर उभी करुन त्याठिकाणी उभे असलेल्या निंबा आनंदा पाटील (वय ४६, रा. भवरखेडा, ता. धरणगाव) यांना भरधाव कारने धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची घटना दि. २१ रोजी लोंढवे फाट्याजवळ घडली. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील गजानन राघो पाटील हे दि. २१ रोजी हे जानवे येथील मित्राकडे कानुबाई मातेच्या उत्सावासाठी त्यांचे साडू निंबा पाटील यांना घेवून (एमएच १९ एजी ३३०२) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले. अमळनेर मार्गे धुळे रोडने जात असतांना लोंढवे फाट्याजवळ त्यांची दुचाकी पंक्चर झाली. त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केल्यानंतर निंबा पाटील हे दुचाकीजवळ उभे होते. यावेळी अमळनेरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने निंबा पाटील यांना जोरदार धडक दिली. या अपघातात निंबा पाटील हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कारचालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे