जळगाव मिरर | २० नोव्हेबर २०२३
राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक जिल्ह्यात लाच घेण्याचे प्रमाण आता कोट्यावधी रुपयापर्यत गेली असून अशीच एक धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. श्री स्वामी समर्थ आश्रमाच्या विश्वस्ताकडून १० लाखांची खंडणी घेताना एका आईसह मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे विश्वस्ताने १ कोटी ५ लाख रुपये अटक करण्यात आलेल्या महिलेला यापूर्वी दिल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी अटक करण्यात आलेली महिला कृषी अधिकारी असल्याचे समोर आले आहे. स्वामी समर्थ आश्रमात ही महिला २०१५ पासून जात होती. महिलेची आणि आश्रमाचे विश्वस्त यांची २०१५-१६ पासून जवळीक होती. याच काळात अटक करण्यात आलेली महिला सारिका सोनवणे आणि मुलगा मोहित सोनवणे यांनी अश्लील व्हिडीओ असल्याचे सांगत विश्वस्त निंबा शिरसाठ यांच्याकडून पैसे उकळले आहेत. याच प्रकरणी १० लाखांची रक्कम स्वीकारत असताना या दोघांना जहान सर्कल परिसरात अटक करण्यात आली आहे.
श्री स्वामी समर्थ आश्रमाचे विश्वस्त निंबा शिरसाठ यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाकडून त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास गंगापूर पोलीस करीत आहे. दरम्यान, महिलेकडे असा कोणता व्हिडिओ आहे? ज्यामुळे आत्तापर्यंत महिलेला संबंधित तक्रारदराने आतापर्यंत १ कोटीहून अधिकची रक्कम दिली आहे. अध्यात्मिक संस्थेचे विश्वस्त यांच्याकडे इतकी रक्कम कुठून आली? ती महिलेला रोख स्वरूपात कशी काय दिली? याचाही तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे.