जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२३
देशातील संसदेत गेल्या आठवड्यात घूसखोरी झाल्यानंतर विरोधकांनी संसदेत टीकेची झोड उठविली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली आहे. संसदेतील कथित घुसखोरीच्या मुद्यावरून विरोधकांनी आजही टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणी सभागृहात प्रचंड गदारोळ केल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे या 2 खासदारांसह एकूण 41 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली.
संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या 41 खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर अध्यक्षांनी या खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली. निलंबित खासदारांत सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांच्यासह शशी थरूर, डिंपल यादव, मनीष तिवारी, मोहम्मद फैजल, कार्ती चिदंबरम, सुदिप बंडोपाध्याय, दानिश अली आदी खासदारांचा समावेश आहे.