जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२३
राज्यात गेल्या वर्षभरापासून शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय सुरु असून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र या मुदतीमध्ये निर्णय देणे अवघड असल्याचे सांगून राहुल नार्वेकर यांनी ही मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून आता १० जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावतीने वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, माननीय न्यायालयाने ३१ डिसेंबर पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले होते. अध्यक्ष २८ डिसेंबर पर्यंत सुनावणी पूर्ण करणार असून निकाल देण्यासाठी त्यांना काही वेळ हवा आहे. २ लाख ७१ हजार पानांचे सबमिशन असल्यामुळे लगेच निकाल देणे शक्य होणार नाही. सध्या अध्यक्ष सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुनावणी घेत आहे. निकाल देण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीपर्यंतची वेळ वाढवून दिली. दुसरीकडे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मात्र वेळ वाढवून मागण्याच्या मागणीचा विरोध केला. हा वेळकाढूपणा करण्याचा प्रकार आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.