जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२४
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील नाल्यात हॉटेल हेवनमचे मॅनेजर व गडकरी नगरमध्ये राहणारे अजय अनिल रंगारे (वय ४२) यांचा मृतदेह १३ रोजी मध्यरात्री आढळून आला. शनिवारपासून ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय रंगारे हे शनिवारी सकाळी हॉटेल हेवनमधून निघाले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. दरम्यान, अजय रंगारे हे बेपत्ता झाल्याने नातेवाईकांकडून शोध सुरू होता. दरम्यान, १० ऑगस्टला सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते शनी मंदिराजवळील नाल्याच्या शेजारी ढाप्याजवळ बुट घालताना तोल जावून नाल्यात पडल्याचे फुटेज शनी मंदिराच्या कॅमेऱ्यातून दिसले. यानंतर नातेवाईकांना शोध घेतल्यानंतर घटनास्थळापासून सुमारे ३५० मीटर अंतरावरील हॉटेल मल्हारसमोरील ढाप्याखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. तर ज्या दिवशी ते नाल्यात पडले, त्यादिवशी दमदार पाऊस सुरु होता. त्यामुळे या मार्गावर तुरळक वर्दळ असल्याने ही घटना कुणाच्याही लक्षात आली नाही. दरम्यान, मृत अजय यांच्या मृतदेहाचे बुधवारी सकाळी शवविच्छेदन करुन दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत अजय यांच्या पश्चात वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.