जळगाव मिरर । १० डिसेंबर २०२३
जळगाव शहर गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटनेपासून दूर असतांना आज मात्र भरदिवसा एका २६ वर्षीय तरुणाचा खून तर दुसऱ्या तरुणावर हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना १० डिसेंबर रोजी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगर येथील वंजारी टेकडी जवळ जुन्या किरकोळ वादातून एका -२६ वर्षे तरुणाचा कोयता व चॉपर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी समोर आली आहे. तर यात अरुण बळीराम सोनवणे (वय-२६) रा.समता नगर या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समजते. दोन जण गंभीरित्या जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अरुण सोनवणे याचे त्याच परिसरात राहणारे इतर तरुणांसोबत किरकोळ वाद होता. दरम्यान या वादाच्या अनुषंगाने आज सकाळी देखील हा वाद झाला त्यानंतर हा वाद काही तरुणांच्या मदतीने मिटवण्यात आला. काही अवधी मिटत नाही, तोपर्यंत दुपारी पुन्हा हा वाद उफाळून आला, त्यामुळे समोरील गटातील काही तरुणांनी अरुण सोनवणे याला एकट्याला वंजारी टेकडी येथे समझोता करण्यासाठी बोलावले. त्यावेळी अरुण हा एकटा गेला. दरम्यान अरुण हा टेकडीवर गेल्याची माहिती त्याचा मोठा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे आणि त्याचा मित्र आशिष संजय सोनवणे यांना मिळाली. काहीतरी बरे वाईट होईल, या उद्देशाने त्यांनी तातडीने वंजारी टेकडी येथे धाव घेतली. दरम्यान तिथे काही समझोता होण्यापूर्वीच समोरील काही चार ते पाच जणांनी चॉपर आणि कोयताने सपासप वार करून अरुण सोनवणे याचा निर्घृण खून केला. यात अरुणच्या मानेवर छातीवर पोटावर गंभीरित्या वार करून जागीच ठार केले तर गोकुळ याच्या हाताला आणि सोबत असलेला आशिष सोनवणे याच्यावर देखील सात ते आठ वार करून त्याला देखील जखमी केले.
ही घटना घडल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. गोकुळ आणि आशिष यांच्यासह इतरांनी अरुण सोनवणे याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणीअंती अरुण सोनवणे याला मयत घोषित केले. ही घटना घडल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वातावरण तापले होते, यावेळी रामानंदनगर आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी धाव घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.