जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२३
गेल्या ४० दिवसापासून नाशिक येथील महसूल आयुक्त कार्यालयासमोर योगेश खताळ व त्याची बहीण अश्विनी हे दोघे उपोषणाला बसले असून ४० दिवस उपोषणाला बसून सुद्धा कोणी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या दोघा भाऊ बहिणीने आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महसूल आयुक्त कार्यालयात मंत्री गिरीश महाजन हे झेंडावंदन करण्यात येणार असल्याने त्यांच्यासमोरच आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
नाशिक मधील भूमी अभिलेख विभागाच्या गलथान कारभारामुळे वडिलोपार्जित क्षेत्र गमवण्याची वेळ आल्यामुळे संबंधित विभागाकडून न्याय मिळाला नाही म्हणून चांदवड तालुक्यातील योगेश खताळ व त्याची बहीण अश्विनी खताळ यांनी गेल्या ४० दिवसापासून येथील महसूल आयुक्त कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे. परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर या दोघा भाऊ बहिणींनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी येथील महसूल आयुक्त कार्यालयसमोर मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्या अगोदरच या दोघा भाऊ बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले.