जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक गावात चोरीच्या अनेक घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना बुलढाणा शहरात घडली आहे. एका लग्न समारंभात हळदीसाठी आलेल्या महिलेने नवरीचे दागिनेच पळवलेत. महिलेने हळदीचा कार्यक्रमातून नवरीच्या दागिन्यांची बॅग लंपास केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरातील हॉटेल बुलढाणा रेसिडेन्सी येथे लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी वधूसाठी आणलेल्या सोन्याच्या दागिन्यांची पर्स एका ठिकाणी ठेवली होती. अज्ञात महिलेने या पर्सवर पाळत ठेवून पर्ससकट दागिने लंपास केलेत.
१३ तोळे सोन्याचे दागिने आणि २ मोबाईल असा एकूण ६ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल या पर्समध्ये होता. वधूची आई जया खरात यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. बुलढाण्यातील संग्रामपूरमध्ये देखील पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणातील आरोपींवर कारवाई केली आहे. संग्रामपूर तालुक्यात चोरीच्या प्रमाणात अधिकच वाढ झाल्याने तामगाव पोलीस अधिक अलर्ट मोडवर आले आहेत. नुकतेच तामगांव पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणात विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
दुचाकी चोरी करणाऱ्या एका भामट्या चोराला पोलिसांना पकडण्यात यश आले असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयात आरोपीला दोन दिवसांचा पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपी दत्तात्रय मनोहर वेरूळकार रा. धामणगावं गोतमारे याने दोन मोटारसायकल चोरी केल्याची स्वतः कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी सह २ दुचाकी असा १ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विविध कलमानुसार आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे.