जळगाव मिरर | २७ जुलै २०२४
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथे प्रांताधिकारी, तहसिल व भूमी अभिलेख आदी महसूल विभागाचे कार्यालय हे चाळीसगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असून बरेच कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो व किरकोळ कामांसाठी देखील या कार्यालयातून त्या कार्यालयात जाण्यासाठी पायपीट करावी लागते.
ही कार्यालये शहराच्या रहदारीच्या ठिकाणी असल्याने वाहतुकीची कोंडी होणे यामुळे नागरिकांसह विविध शासकीय विभागांची देखील गैरसोय होत होती. अनेक तालुक्यांना सर्व विभाग एकाच ठिकाणी असणारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असल्याने चाळीसगाव तालुक्यात देखील ती असावी अशी मागणी अनेक दशकांपासून होत होती. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश येऊन दीड वर्षापूर्वी २५ कोटी रुपयांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली होती. चाळीसगाव शहरातील शासकीय दूध डेअरी जवळील १५ हजार चौरस मीटर जागा यासाठी आरक्षित करण्यात आली असून 2 मजले असणाऱ्या या इमारतीत तळ मजल्यावर 1827 चौरस मीटर व पहिल्या मजल्यावर 1801 चौरस मीटर बांधकाम आहे.
सदर इमारत बांधकामासाठी २४ महिन्यांची मुदत होती मात्र आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकाराने केवळ १६ महिन्यात अश्या विक्रमी वेळेत बांधकाम पूर्ण झाले असून येत्या २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सदर भव्य अश्या इमारतीचे लोकार्पण ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे.
यामुळे गेल्या अनेक दशकांचे चाळीसगाव वासीयांचे स्वप्न साकार झाले असून उत्तर महाराष्ट्रातील एकमेव अशी मॉडेल मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पाहायला मिळणार आहे. तरी या लोकार्पण सोहळ्याला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती राहावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तालुक्याच्या विकासयात्रेत मानाचा तुरा ठरेल – आमदार मंगेश चव्हाण
शेतकरी, विद्यार्थी, वृद्ध, महिला, व्यापारी, उद्योजक, आदी समाजातील सर्व घटकांचा दररोजचा संबंध शासकीय कार्यालयाशी येतो. मात्र अगदी किरकोळ कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयात जाण्यासाठी वेळ, पैसा, श्रम वाया जात होते. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतांना चाळीसगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणारी शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणावीत अशी मागणी अनेक नागरिकांनी बोलून दाखविली होती. तालुक्याच्या विकासयात्रेत एक मानाचा तुरा ठरेल असे काम करू शकलो याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कार्यरत एकत्र येणार ८ शासकीय कार्यालये, मिळणार अत्याधुनिक सुविधा
सुमारे २५ कोटी रुपये या बहुचर्चित मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत चाळीसगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणारी जवळपास ८ शासकीय विभाग एकाच ठिकाणी कार्यरत होणार आहेत.
समाविष्ठ कार्यालये व अधिकारी दालने खालीलप्रमाणे
१ – तहसिल कार्यालय – निवासी नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार, पुरवठा शाखा, महसूल शाखा, संजय गांधी योजना, रोहयो शाखा, निवडणूक शाखा, संगणकीकरण कक्ष
२ -तालुका भूमी अभिलेख कार्यालय –
३ – सहाय्यक निबंधक कार्यालय –
४- उपकोषागार कार्यालय,
५ – दुय्यम निबंधक कार्यालय १ व २ – स्ट्रोंग रूम, ट्रेझरी रूम
६ – मुद्रांक कार्यालय,
७ – सामाजिक वनीकरण कार्यालय –
आदी शासकीय कार्यालयांसाठी १५ दालने
तसेच प्रशासकीय सोयीसाठी अत्याधुनिक व वातानुकूलित सभागृह, संगणक व सर्वर कक्ष, सेतू सुविधा कक्ष, लोक अदालत कक्ष देखील यात असणार आहेत. तसेच अधिकारी, कर्मचारी व शासकीय कामानिमित्त येणारे नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी अत्याधुनिक शौचालय व स्वच्छतागृहे सदर इमारतीत आहेत.
इमारतीचे वैशिष्ट्ये