जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२४
देशातील जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये रविवारी रात्री दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्या लोकांवर हल्ला केला. यामध्ये एका डॉक्टरसह 7 जणांचा मृत्यू झाला. तसेच 5 मजूर जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांना श्रीनगर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले.हे सर्व कामगार केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बोगद्याच्या प्रकल्पात काम करत होते. हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. रविवारी रात्री सुरू झालेली शोधमोहीम सोमवारी सकाळीही सुरूच आहे.
गांदरबलच्या या हल्ल्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारामुल्लामध्येही सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. या भागातही सर्च ऑपरेशन सुरू आहे.
गांदरबलमध्ये ज्या भागात दहशतवादी हल्ला झाला तो सीएम ओमर अब्दुल्ला यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो. ते म्हणाले- मी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही, असे गृहमंत्री शहा म्हणाले. दरम्यान, हा हल्ला देशाच्या विकासात योगदान देणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.बडगाम येथील शाहनवाज अहमद असे डॉक्टरचे नाव आहे. पंजाबमधील गुरुदासपूर येथील गुरमीत सिंग, बेहार येथील अनिल कुमार शुक्ला आणि फहीम नजीर, कठुआ येथील शशी अब्रोल, मोहम्मद हनीफ आणि बिहारमधील कलीम अशी अन्य सहा मृतांची नावे आहेत.