
जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२३
देशभरातील बदलत्या हवामानामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या हाहाकाराने मोठे नुकसान होत आहे तर सध्या तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडूतील तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी आणि कन्याकुमारी चार जिल्हे अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
सोमवारी १८ डिसेंबर रोजी मुसळधार पावसामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या काळात शाळा, महाविद्यालये, बँका, खाजगी आस्थापना आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या देखील बंद राहतील. भारतीय हवामान विभागाने आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोमोरिन परिसरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. तामिळनाडूमध्ये पाऊस तर उत्तर भारतात बर्फवृष्टीमुळे तापमानाच्या पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. गुलमर्ग ते औली पर्यंतच्या पर्वतांवर बर्फाची चादर पसरली आहे. बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बहुतांश शहरांमध्ये दिसून येत आहे. उत्तर भारतात तापमानात घट दिसून येते.
हवामान खात्यानुसार, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही थंडी सतत वाढत आहे. पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत दाट धुके पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. येथे पारा उणे 4 अंशांवर नोंदला गेला. मुसळधार बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधील अनेक भागात रस्ते ठप्प झाले आहेत.