जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२४
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहिण’ योजना सुरु केल्यापासून राज्यातील अनेक बँकेमध्ये मोठी गर्दी दिसून येत असतांना नुकतेच इगतपुरी व घोटी शहरातील केवायसीसाठी काही महिलांनी बुधवारी रात्री स्टेट बँकेच्या बाहेर मुक्काम केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी संबंधित स्टेट बँकेच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन महिलांना केवायसीसाठी जो त्रास सहन करावा लागत आहे याची कल्पना दिली. केवायसीसाठी महिलांना ताटकळत न ठेवता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून त्वरित केवायसी करावी, अन्यथा या बँकेला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला.
महिलांना केवायसीसाठी होणारा हा सर्व त्रास फक्त स्टेट बँकेतच होत असल्याचा आरोप या वेळी महिलांनी केला. लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वस्त केले होते. इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लाडक्या बहिणींना भरपावसाळ्यात बँकेच्या आवारात मुक्काम करण्याची वेळ आली आहे. बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान आदिवासी वाड्या-पाड्यावरील या महिलांनी घोटी येथील स्टेट बँकेच्या आवारात मुक्काम ठोकला होता. केवायसी व आधार लिंक फॉर्म भरण्यासाठी या महिला बँकेत ५ दिवसांपासून रोज येऊनही प्रचंड गर्दीमुळे गावी परत जावे लागते. सकाळपासून येऊनही काम होत नसल्याने महिलांनी बँकेच्या आवारातच रात्री मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. लांब गाव-पाड्यातून महिलांना या कामासाठी रोज ये-जा करून भाडे परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी बँक उघडल्यावर लवकर नंबर लागेल अन् योजनेचे पैसे मिळतील या आशेने महिलांनी बँकेच्या आवारात मुक्काम ठाेकला आहे.
घोटी शहर हे एकमेव तालुक्याची मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी दहा ते पंधरा किलोमीटर अंतर असलेल्या खेड्यापाड्यावरील महिला घोटी स्टेट बँकेत येत असतात. मात्र, बँकेचा कारभार गलथान आहे. कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे अधिकारी वर्गाची मुजोरी वाढली आहे. असाच प्रकार वाडीवऱ्हे स्टेट बँकेतदेखील बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे वाडीवऱ्हे स्टेट बँकेत रविवारी सरकारी सुटी असताना बुधवारीदेखील बँकेला कुलूप लावलेले असते. मग हा मनमानी कारभार चालतो कसा? असा प्रश्न महिलांसह नागरिकांनी केला आहे.