जळगाव मिरर | १७ जुलै २०२४
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याचे काम सुरु केले असून आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात दाखल असतांना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन तर बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा 8 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्या वेतन देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं उद्घाटनही केलं. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी एका योजनेची घोषणा केली.
लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला 6 हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी सुद्धा मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.