जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२४
जळगाव शहरातील प्रत्येक नागरिक हा महानगरपालिकेला कर भरीत असतो. त्या कर भरण्याच्या माध्यमातून महानगरपालिका जळगावकर नागरिकांना रस्ते, गटर, पिण्याचे पाणी व परिसरातील स्वच्छता ही सुविधा पुरवीत असते. मात्र ही सुविधा मनपाने पुरवली नाही तर जळगावकर नागरिकांनी का म्हणून कर भरावा याचा प्रश्न सध्या जळगावतील काही प्रभागात नागरिकांच्या मनात येवू लागला आहे.
जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील त्रिभुवन कॉलनी, के.सी.पार्क या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून गटारींची साफसफाई होत नसल्याने या परिसरातील अनेक नागरिकांना स्वतःच्या हातात बांबू किंवा फावडा घेऊन गटारी काढाव्या लागत आहे. जर त्या गटारी नागरिकांनी काढल्या नाही तर गटारीचे खराब पाणी घरामध्ये येत आहे. त्यामुळे जळगाव शहरातील अनेक परिसरात पुन्हा एकदा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ही शुल्लक गोष्ट महानगरपालिकेतील उच्च शिक्षित अधिकाऱ्यांच्या समजण्यापलीकडची नक्कीच नसेल. तरीदेखील मनपाचे अधिकारी जळगाव शहरातील नागरिकांचे प्राण धोक्यात घालत आहेत का ? असा देखील प्रश्न परिसरात निर्माण होत आहे. ही घटना गेल्या पाच महिन्यापासून या प्रभागातील नागरिकांसोबत घडत असून देखील यावर कुठलेही उपाययोजना होत नसल्याने परिसरातील नागरिकांनामध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.
शिवशंकर कॉलनी तेच हाल !
प्रभाग क्रमांक १ मधील शिवशंकर कॉलनी परिसरात गेल्या दोन ते अडीच वर्षापासून गटारी व गटारींच्या ढापेचे तेच हाल असल्याने नागरिकांना हातात फावडे घेऊन गटारी काढाव्या लागत आहे. याबाबत मनपा व तत्कालीन नगरसेवकांना तक्रारी करून या परिसरातील नागरिक थकले मात्र गेंड्याच्या कातडीचे तत्कालीन नगरसेवक व अधिकारी याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत असल्याचे नेहमीच समोर आले आहे. या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना देखील जळगाव मनपातील आरोग्य विभाग व तत्कालीन नगरसेवकांना नागरिकांच्या आरोग्याचे पडले तरी काय त्यांना केवळ मतदानाचा हक्क नागरिकांचा हवा असतो व मनपाला नागरिकांकडून कर महत्त्वाचा असतो. त्यांच्या आरोग्याचे त्यांचे देणे घेणे काहीच नाही. ही बाब या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.
मनपात आलेला निधीचे होते काय ?
जळगाव महानगरपालिकेत इतक्या कोटीचा निधी आरोग्य व बांधकाम विभागात येऊन देखील जर कर भरणाऱ्या नागरिकांना या छोट्या मोठ्या सुविधा महानगरपालिका देऊ शकत नसेल तर कुठल्या गोष्टीचा महानगरपालिका कर घेते याकडे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. या बांधकाम विभागात ठेकेदार व अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने अनेक परिसरात आज देखील खराब रस्त्यांची नियोजन मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिकांच्या तक्रारी असून देखील अनेक अधिकारी या तक्रारींकडे कानाडोळा करीत पद्धतशीररीत्या या प्रश्नांना बगल देत आहे. त्यामुळे बंडखोरांच्या प्रश्नावर अधिकारी मंडळी योग्य ते नियोजन करीत नसल्याचा अभाव समोर आला आहे.