
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा निकाल सर्वात कमी असल्याने राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. निकालात घट झाली असली तरी कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
- कोकण – 94.14%
- पुणे – 91.25%
- अमरावती – 90.92%
- नाशिक – 90.72%
- मुंबई – 90.08%
- कोल्हापूर – 89.97%
- छत्रपती संभाजीनगर – 88.68%
- नागपूर – 88.67%
- लातूर – 84.14% (राज्यात शेवटचा)
राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआयसाठी 14,44,713 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,33,058 विद्यार्थी परीक्षेस बसले आणि 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 37,559 खाजगी विद्यार्थ्यांपैकी 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णता 80.21% इतकी आहे. 50,876 पुनर्परीक्षार्थ्यांपैकी केवळ 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णता 36.44% इतकी राहिली. 8,446 दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 7,579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णता 90.58% इतकी आहे. मुलींची उत्तीर्णता 93.15% असून मुलांची 86.80% आहे. म्हणजेच मुली 6.35% ने आघाडीवर आहेत. एकूण 153 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100% लागला आहे.






















