जळगाव मिरर / २८ एप्रिल २०२३ ।
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे लांबणीवर पडलेली बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी शुक्रवार २८ रोजी जळगाव जिल्ह्यात बहुतांश मतदान केंद्रांवर नेहमीप्रमाणे मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असतांनाच गोंधळ घालण्यासाठी तयारच असल्याचा अनुभव बहुतांश मतदान केंद्रावर दिसून आला.
जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव आणि भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर या १२ बाजार समित्यांसाठी आज दि.२८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ४ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली. १२ बाजार समित्यांसाठी दुपारी २ वाजेपर्यंत एकूण ७३.४० टक्के मतदान झाले. दरम्यान, जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालय परिसरातील एका मतदान केंद्राबाहेर बोगस मतदान असल्याच्या कारणावरुन गोंधळ उडाला. निवडणूक निर्णय अधिकारी व हमाल व मापारी मतदार संघाचे उमेदवारामध्ये शाब्दीक खंडाजंगी उडाली. जळगाव वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान सुरु होते.
ज्या केंद्रावर गोंधळ उडाला त्याठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच एलसीबीचे पोलीस निरीक्षक नजन पाटील, जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी नूतन मराठा महाविद्यालय परिसरातील मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून उभे होते. तसेच चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्यातील १२ कृउबा समिती निवडणुकीसाठी आज दि.२८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला असला तरी ८.३० वाजेनंतरच मतदानास सुरुवात झाली. १२ बाजार समित्यांसाठी सकाळी दहा वोजपर्यंत सरासरी २०ते २२ टक्के मतदान झाले होते. दुपारी २ वाजेपर्यंत २९ हजार ३६९ मतदारांपैकी २१ हजार ५५६ मतदारांनी मतदान केल्याने सरासरी ७३.४ टक्के मतदान झाले होते.