जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२३
जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप-शिवसेनेच्या (शिंदे गट) सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाला. त्यामुळे अनेक मंत्र्यांचे खाते काढून घेण्यात येऊन पवार गटाला देण्यात आले. त्यात माझेही वैद्यकीय शिक्षण खाते गेले, अशी खंत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जळगावात व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉक्टरांचे कार्य हे परमेश्वरी कार्य असून, त्यांच्या कौशल्यामुळे जनसामान्यांना मोठा आधार मिळतो. आता ग्रामविकास विभागाची जबाबदारी आपल्याकडे आहे. त्या विभागामार्फत आपले कार्य सुरूच राहणार आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधनही आमच्याच सरकारने वाढविल्याचे महाजन म्हणाले.
राज्याच्या राजकारणात सत्ताधारी पक्षात अजित पवार यांचा गट सामील झाल्यानंतर शिंदे गटाच्या काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती तर त्या पाठोपाठ भाजपच्या देखील आमदारांसह मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असतांना आज पुन्हा एकदा हि नाराजी उघड चर्चेत आली आहे.