जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४
राज्यात नुकतेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. हा उत्सव यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी – केळापूर येथे देखील साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपच्या एका आमदाराने गौतमी पाटील सोबत ठेका धरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून आता विरोधकाकडून जोरदार टीका सध्या भाजपच्या आमदारावर होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची याचना करत असताना भाजप आमदार संदीप धुर्वे यांचा गौतमी पाटीलसोबतचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप आमदार नामदेव ससाणे व भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी 3 सप्टेंबर रोजी उमरखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मेदानावर दहीहंडी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील यांना बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी एका हिंदी गाण्यावर भन्नाट डान्स केला.
दहीहंडीच्या कार्यक्रमाला गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यातच सत्ताधारी भाजपच्याच आमदाराने गौतमीसोबत ताल धरल्यामुळे एकच गजहब झाला. यासंबंधीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत आमदार संदीप धुर्वे हे गौतमीच्या मागे-पुढे करत एका हिंदी गाण्यावर नाचताना दिसून येत आहेत. एकेक्षणी गौतमी या प्रकाराला कंटाळून मागे जाते. पण नंतर ती पुन्हा परत येऊन आमदारांसोबत काहीवेळ डान्स करते.
उल्लेखनीय बाब म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात यंदा ओला दुष्काळ्याची स्थिती आहे. गत 4 दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांतील पूरस्थिती अद्याप ओसरली नाही. या स्थितीत सत्ताधारी पक्षाकडून संवेदनशीलतेची अपेक्षा केली जाते. त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा असते. पण तेच अशा कार्यक्रमांत नाचगाणे करत असल्यामुळे जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.