जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२६
अमळनेर तालुक्यातील निसर्डी धरणावर ३ रोजी रात्री मासे पकडायला व्यक्ती पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव दामू सोनवणे (वय ५६) हे ३ ऑगस्टला सायंकाळी निसर्डी धरणावर मासे पकडायला गेले होते. ते रणाईचे शिवारातून जाळ्यासह धरणात उतरले होते. दरम्यान, नामदेव सोनवणे हे रात्रभर घरी आले नाहीत. त्यामुळे सकाळी त्यांच्या आईने त्यांना शोधण्यासाठी त्यांच्या भावाला पाठवले होते.
याच वेळी नामदेव सोनवणे यांच्या भावाला व इतर ग्रामस्थांना धरणावर नामदेव सोनवणे यांचे कपडे व चप्पल काढलेले आढळले. त्यांनी दूरवर पाण्यात पाहिले असता पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर मृतदेहाला बाहेर काढण्यात आले. त्यावेळी सोनवणे यांच्या पायात जाळे अडकलेले असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच नोंद करण्यात आली आहे. य घटनेचा तपास हे. कॉ. काशिनाथ पाटील करत आहेत. या दुर्दैव घटनेमुळे निसर्डीसह परिसरा शोककळा पसरली आहे.




















