जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगणार आहे.
भाजपने मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानात परिवर्तन दहीहंडीचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी येथील कार्यक्रमाला हजर राहून मानाची हंडी फोडली. वरळी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे भाजपने या दहीहंडीच्या माध्यमातून येथे मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.
15 गोविंदा जखमी
मुंबई – मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह सुरू असताना दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईत मानवी थरांवरून कोसळल्यामुळे 15 गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत विविध पथकातील 15 गोविंदा जखमी झालेत. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 4, सायन रुग्णालयात 2, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 1, पोद्दारमध्ये 4, राजावाडीमध्ये 1, एमटी अगरवार रुग्णालयात 1 आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर आहे.