जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२४
गेल्या काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलिवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. यापूर्वीच या चित्रपटाचा टिझर देखील रिलीज झाला होता. टीझरसह, ट्रेलरला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली होती.
बहुप्रतीक्षित धर्मवीर- 2 चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. आता येत्या 27 सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी 9 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
दरम्यान, आता सध्याची राज्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात असून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या 27 सप्टेंबरला धर्मवीर 2 चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे. झी स्टुडिओजने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शनाची रिलीज डेट जाहीर केली आहे. धर्मवीर- 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… 27 सप्टेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !” असे कॅप्शन देत निर्मात्यांनी रिलीज डेटची माहिती दिली आहे.