
जळगाव मिरर | ४ मे २०२६
महाराष्ट्रात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेली ‘डायल ११२’ ही अत्याधुनिक आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली आता प्रभावीपणे कार्यरत असून, संकटाच्या क्षणी नागरिकांसाठी जीवनदायी ठरत आहे. ‘एक देश, एक नंबर’ या संकल्पनेवर आधारित असलेली ही सेवा २४ तास उपलब्ध असून, एका कॉलवर विविध आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्याची सुविधा यातून मिळते.
या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे जलद प्रतिसाद आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. नागरिकांनी ११२ या क्रमांकावर कॉल केल्यानंतर काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जीपीएस तंत्रज्ञानामुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे अचूक लोकेशन त्वरित शोधले जाते, त्यामुळे मदत पोहोचवण्यात होणारा विलंब टाळला जातो. ‘डायल ११२’ ही सेवा केवळ पोलीस मदतीपुरती मर्यादित नसून, अग्निशमन दल (१०१), रुग्णवाहिका (१०८) आणि महिला हेल्पलाइन (१०९१) या सर्व सेवांचा एकत्रित लाभ नागरिकांना मिळतो. त्यामुळे वेगवेगळे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नसून, एकाच नंबरवरून सर्व सेवा उपलब्ध होतात.
महाराष्ट्र पोलिसांनी या सेवेसाठी नवी मुंबई आणि नागपूर येथे अत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारले आहेत. नागरिकांचा कॉल प्राप्त होताच तेथील अधिकारी संबंधित माहिती जवळील पोलीस पथकाला तातडीने पाठवतात. प्रत्येक पोलीस वाहनात ‘मोबाईल डेटा टर्मिनल’ बसवण्यात आले असून, त्यावर घटनास्थळाचा नकाशा आणि तपशील त्वरित दिसतो. यामुळे प्रतिसाद अधिक वेगवान आणि अचूक बनतो.
मारामारी, चोरी, अपघात, आग लागणे, महिला व मुलांच्या सुरक्षेचे प्रश्न किंवा नैसर्गिक आपत्ती अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ‘डायल ११२’ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही प्रणाली नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, संकटाच्या वेळी तत्काळ मदत मिळवण्यासाठी ‘डायल ११२’ ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.




















