जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३
आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली आहे. त्याचा मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला असता नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला. पाळधी पोलीस दुरक्षेत्रात घडण्याची नोंद करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील सावदे येथील विकास सुपडू पठाण हे पत्नी मोनी व ३ वर्षाचा मुलगा रोहित याच्यासोबत वास्तव्यास असून दि. २ ऑक्टोबर सोमवारी सकाळी पठाण हे शेताच्या कामाला निघून गेले होते. दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास रोहित हा त्याची आई मोनीबाई तिच्यासोबत खदानीवर कपडे धुण्यासाठी गेला होता तेथे खेळत असताना अचानक त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला. रोहित विकास पठाण (भिल,वय-३) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून काही पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य साळुंके यांनी त्याला मयत घोषीत केले. याबाबत पाळधी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते. रोहित हा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.