जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२४
मुंबई येथे लेवा पाटीदार समाजाची बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीत विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली. यात असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासह पाडळसे येथे भोरगाव पंचायत येथील लेवा भवनसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्व प्रकल्पांसाठी निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे, अशी माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे.
मुंबईत लेवा पाटीदार समाजाच्या प्रतिनिधींसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमूख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री हंसराज अहिर, सहकार राज्यमंत्री अतूल सावे, जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, संजय गाते, भाजपचे पदाधिकारी विजय चौधरी, संजय केणेकर यांच्यासह लेवा पाटील समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाकरता आणखी अतिरिक्त २० कोटी रुपयांची मागणी पर्यटन विभागामधून करण्यात आली. सदर मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
बैठकीत आ. राजूमामा भोळे यांनी समाजाच्या वतीने भूमिका मांडली. पुणे व मुंबई येथे लेवा समाजाचे आर्थिक दृष्ट्या जे विद्यार्थी गरीब आहे त्यांना राहण्यासाठी वस्तीगृहाची व्यवस्था होणेसाठी मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. यावल तालुक्यातील पाडळसे येथे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडील ग्रामविकास विभागामार्फत भोरगाव पंचायत येथे लेवा भवन बांधकामकरिता ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचे काम देखील प्रगती पथावर आहे. या परिसरात स्वर्गवासी रमेश विठू पाटील यांचा पुतळा उभा करण्यात यावा ही अशी सुद्धा समाजातर्फे करण्यात आलेली मागणी पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बैठकीला राज्यातील लेवा पाटीदार समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.